जामनेर (प्रतिनिधी) तुझ्या आईचे सोने-चांदीचे दागिने आणून दिले नाहीत, तर मोबाईलमध्ये काढलेले फोटो व्हायरल करून गावात तुझी बदनामी करेल, अशी अल्पवयीन मुलीला धमकी दिल्याप्रकरणी जामनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयित आरोपीला अटक केली आहे. नितेश शंकर राठोड असे संशयित आरोपीचे नाव आहे.
या संदर्भात १७ वर्षीय पिडीत तरुणीने पोलीसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, १५ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नितेश राठोड याने पिडीत अल्पवयीन असल्याचे माहित असूनही तिच्या अज्ञात पणाचा फायदा घेत तीला त्याच्या राहते घरी बोलावले होते. यावेळी निलेशने एकांताचा फायदा घेत पिडीतेसोबत तीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच तू जर तुझ्या आईचे सोने चांदीचे दागिने आणले नाहीत, तर मी गावात तुझी बदनामी करेल. एवढेच नव्हे तर माझ्या मोबाइलमध्ये असलेले फोटो सुध्दा व्हायरल करेल. तसेच तुझ्या भावास जिवे मारुन टाकेल, अशी धमकी दिली. या प्रकरणी २ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून निलेश राठोड याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हे करीत आहेत.
















