अमरावती (वृत्तसंस्था) सप्राईज गिफ्ट देण्याच्या नावाखाली डोळ्यावर पट्टी बांधत नंतर प्रेयसीचा गळा चिरल्याचा रक्तरंजित थरार अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यातील एका लॉजमध्ये सोमवारी दुपारी घडला. धक्कादायक म्हणजे प्रेयसीचा गळा चिरल्यानंतर प्रियकराकडूनही आत्महत्येचा प्रयत्न झाला. सोशल मीडियावर जुळलेल्या प्रेमाचा रक्तरंजित शेवट बघून समाजमन सुन्न झाले आहे. संकेत दिनेश मांडवकर (२२, रा. आमनेर, ता. वरुड) असे त्या प्रियकराचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, जखमी १९ वर्षीय युवती ही अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिवासी ऑन ती महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. १९ मार्चला संकेतचा वाढदिवस होता. मात्र, वाढदिवशी दोघांची भेट झाली नाही म्हणून ती आली. तिने संकेतसाठी शर्ट, तर त्याने तिच्यासाठी अंगठी भेट म्हणून आणली होती. त्यांच्या प्रेमात तिसरा आल्याची कुणकुण संकेतला लागली होती. त्याने तिला सोमवारी अमरावतीहून परतवाड्याला बोलावून घेतले. लॉजमध्ये तिच्या डोळ्यांवर त्याने पट्टी बांधली आणि चाकूने तिच्यावर सपासप वार केले. ती झटका देत बाहेर पळाली. दरम्यान, संशयित आरोपी संकेत हा अचलपूर येथे वर्षभरापासून महावितरण कंपनीत अॅप्रेंटिसशिप करतोय. तर त्याची प्रेयसी अमरावती येथील एका विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.