जळगाव (प्रतिनिधी) शहरातील चित्रा चौक परिसरात आज सायंकाळी एकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. आकाश सुरेश सपकाळे (वय 24, रा. कोळीपेठ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
शनीपेठ हद्दीतील आकाश सपकाळे या तरुणाची चित्रा चौक परिसरातील देशी दारु दुकानाजवळ हत्या झाल्यानंतर मारेकरी अण्णा सैंदाणे (पुर्ण नाव माहित नाही) हा पोलिसांना शरण आला आहे. राजु सपकाळे (पुर्ण नाव माहित नाही) हा दुसरा मारेकरी बेपत्ता आहे. तर सागर सुरेश सपकाळे व सागर आनंदा सपकाळे हे दोघे गंभीर जखमी आहेत. जुन्या वादातून हा हत्येचा प्रकार झाला असल्याची चर्चा आहे. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव शहर पोलिस स्टेशन आदींचे गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.
नेमकं काय घडलं ?
मृत आकाशसह जखमी व मारेकरी असे सर्वजण जुने बसस्थानक परिसरातील एका पत्त्यांच्या क्लबवर एकत्र आले होते. या दोन्ही गटांमध्ये पुर्वीपासून वैमनस्य होते. यातच ते समोरासमोर आल्यामुळे आपसात बाचाबाची सुरू झाली. क्षणार्धात त्याचे हाणामारीत रुपांतर झाले. वाद वाढत असल्यामुळे आकाश सपकाळे, सागर सपकाळे व सागर आनंदा सपकाळे हे क्लबवरुन खाली उतरुन रस्त्यावर धावत होते. अण्णा व राजु हे त्यांच्या मागुन धावत येऊन मारहाण करण्याचा प्रयत्न करीत होते. मुख्य रस्त्यावर पोहोचताच अण्णा याने एका भेळच्या गाडीवरुन चाकु हातात घेऊन तीघांवर सपासप वार केले. यात आकाशचा जागेवरच मृत्यू झाला तर सागर सपकाळे व सागर आनंदा सपकाळे हे दोघे गंभीर जखमी झाले.
पोलिसात स्वतःहून हजर
या घटनेनंतर अण्णा हा स्वत:हुन शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला. तर नागरीकांनी मृत आकाश व दोघी जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्यासह पथक रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी जमाव पांगवून नियंत्रण केले.
जुन्यावादातून झाला हल्ला
पोलिस ठाण्यात हजर झालेला अण्णा देखील जखमी होता. आकाश व सागर हे मला मारहाण केली असल्याने तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आल्याचे त्याने सुरूवातीला पोलिसांना सांगीतले. दरम्यान, या हल्ल्यात आकाशचा मृत्यू झाल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी अण्णाला ताब्यात घेतले आहे. अण्णा सैंदाणे व त्याचा भाऊ गोपाल सैंदाणे नावाच्या तरुणांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत या घटनेबाबत गुन्हा दाखल झालेला नव्हता. परंतू एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर मयत आणि मारेकरी काही दिवसांपूर्वी समोरा-समोर राहत होते, असेही कळते.