रामटेक (वृत्तसंस्था) खिंडसी तलावात १७ एप्रिलला पहाटे अनोळखी युवकाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालात युवकाला गळा दाबून ठार केल्यानंतर मृतदेह तलावात फेकून दिल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलीस तपासात भावाच्या जाचाला कंटाळलेल्या सख्ख्या बहिणीनेच प्रियकराला त्याच्या खुनाची सुपारी देऊन संपविल्याची खळबळजनक माहिती उघड झाली. रजत कैलास उघडे (३०, रा. आशीर्वाद नगर, कोतवाली) असे मृताचे, तर आभा उघडे (२८), प्रियकर अतुल भमोडे आणि पप्पू शामलाल बुरडे (२८, कळमना) अशी आरोपींची नावे आहेत.
मृत्यूचे वृत्त कळूनही आई व बहिणीची सामान्य वागणूकीमुळे संशय बळावला !
नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी खुनाचे गूढ उलगडण्यासाठी रामटेक पोलिसांची पाच व स्थानिक गुन्हे शाखेची पाच पथके तयार केली होती. नागपूर ग्रामीण जिल्हा, नागपूरसह छत्तीसगड व मध्यप्रदेशातील पोलीस ठाण्यांत जाऊन हरविलेल्या व्यक्तींची तपासणी करून मृतकाची ओळख पटविली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली. यात दोघींनीही रजतला ठार केल्याची माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला वर्णनावरून आशीवांदनगर, हुडकेश्वर नागपूर येथे राहणारे दीपाली कैलास उघडे (५४) व त्यांची मुलगी आभा उघडे (२८) यांनी नागपुरातील कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन रजत कैलास उघडे (२६, आशीर्वादनगर) हा हरविल्याची तक्रार देण्यासाठी आल्याचे कळले. त्यांनी दीपाली व त्यांची मुलगी आभाशी संपर्क साधला. दोघींनाही मृतकाचे फोटो दाखविले असता त्यांनी तो रजत असल्याची कबुली दिली. दोघांनी तो १६ एप्रिलपासून घरी आला नाही. तसेच दारू पीत असल्याने तो घरी कोणालाही न सांगता बरेच दिवस घरून गायब असायचा. त्यामुळे आजपर्यंत तो हरविल्याची तक्रार दाखल केली नाही, असे सांगितले. त्याच्या मृत्यूचे वृत्त कळूनही आई व बहिणीची वागणूक सामान्य होती.
दोघांकडून पोलिसांची दिशाभूल !
पोलिसांनी मयत रजतच्या मित्रांकडून माहिती काढली. त्यांची विचारपूस केली तेव्हा तो सहा महिन्यांपासून घरीच होता. दारू पीत असल्याने घरचे त्याला कंटाळले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आई व बहिणीकडे रजतबाबत चौकशी केली. दोघीही पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचे लक्षात आले. आभावर संशय बळावल्याने तिचा मोबाइल तपासला असता तिच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला. आभाचा घटस्फोट झाल्यानंतर ती आई व भावाकडे मुलासह राहायची. तांडापेठ येथे राहणाऱ्या अतुल राजू भामोडे (३१) याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध असल्याचे कळले. पोलिसांनी भामोडेला ताब्यात घेतले. अतुलने मित्र पप्पू श्यामलाल बुरडे (२८, रा. कळमना, नागपूर) याला दुचाकी घेऊन रजतच्या घरी पाठविले आणि दारू पिण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन येण्यास सांगितले. अतुलने रजतच्या आईला फोन करून पप्पूला काही पैसे देण्यास सांगितले. त्यानंतर रजतच्या आईने त्याला पाच हजार रुपये देऊन रजतला पप्पूसोबत पाठविले. पप्पू रजतला घेऊन अतुलकडे आला. अतुलने रजत व पप्पूला दिवसभर आपल्यासोबत ठेवले. यादरम्यान अतुलने रजतला दारू पाजली. दारू पिल्यानंतर अतुल, पप्पू व रजत दुचाकीने रामटेकला आले. अतुलने रजतचा गळा दाबून ठार केले व मृतदेह खिंडशी तलावात फेकून दिला. नंतर अतुल व पप्पू आभाला भेटायला तिच्या घरी गेले. दोघींनीही रजतला ठार केल्याची माहिती दिली. भावाच्या त्रासाला कंटाळून बहिणीने प्रियकराला खुनाची सुपारी दिल्याचे उघडकीस आले.
रजतला आजच संपवून टाक !
१४ एप्रिल रोजी आभा स्वामिनारायण मंदिर वाठोडा येथे अतुलला भेटली. रजत दारू पिऊन आल्यावर आम्हाला मारहाण करतो. त्याच्या त्रासाला आम्ही कंटाळलो आहोत. तू काहीतरी कर, असे सांगितले. १६ एप्रिल रोजी रजत दारू पिऊन आला. घरातील सामान फेकून त्याने तमाशा केला. आईला मारहाण केली. आभाने रजतला फोन केला. रजतला आजच संपवून टाक. वाटल्यास मी पैसे देते, असे आभा म्हणाली होती. दरम्यान, चौकशीदरम्यान बहीण आभावर संशय बळावला होता. तिच्या मोबाईलचा सीडीआर काढला असता अतुलचे नाव समोर आले. दोघांचे छायाचित्र आणि प्रेमसंबंध समोर आले. अतुलला पोलिसीखाक्या दाखवताच त्याने खून केल्याची कबुली दिली. अनैतिक संबंधाची कुणकुण लागल्यामुळे वारंवार मारहाण करणाऱ्या सख्ख्या भावाच्या त्रासाला कंटाळलेल्या बहिणीने प्रियकराला सुपारी दिली आणि भावाचा खून केल्याचे अखेर स्पष्ट झाले. हे हत्याकांड ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणले.