सांगली (वृत्तसंस्था) सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी येथे शेकोबा डोंगरावर एका तरुणासह दोन तरुणींनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून आत्महत्या झाल्याची चर्चा परिसरात आहे. आत्महत्येचं नेमके कारण अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, एकाच वेळी तिघांनी केलेल्या आत्महत्येमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तासगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मणेराजुरी गावाजवळ असलेल्या शेकोबाच्या डोंगरावर एका तरुणासह दोन तरुणींनी आत्महत्या केल्याची माहिती गुरुवारी सकाळी मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. डोंगरावर निर्जन स्थळी तीन मृतदेह आढळले. मृतदेहांच्या शेजारी द्राक्ष बागांसाठी वापरले जाणारे कीटकनाशक पडले होते. तसंच चॉकलेट्स, हार आणि पुष्पगुच्छही मिळाले.
या तिघांनीही रात्री विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव हरीश हणमंत जमदाडे (वय २१ रा, मणेराजुरी) असं आहे, तर मृत तरुणीची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे. तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, प्रेमप्रकरणातून हा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तरीही सर्व कारणांचा शोध घेतला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.