मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेता सोनू सूदचे घर आणि कार्यालयासह त्याच्याशी संबंधित ६ ठिकाणी आयकर विभागाने कारवाई केली होती. आयकर विभागाला या छाप्यात अभिनेत्याविरोधात कर चुकवल्याचे सबळ पुरावे सापडले आहेत. आयकर विभागाने आरोप केला आहे की, अभिनेता सोनू सूदच्या चॅरिटी फाउंडेशनने देशाबाहेरील देणगीदारांकडून २.१ कोटी गोळा केले आहेत. यात एफसीआरए नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्रकार घडला आहे.
अभिनेता सोनू सूदवर आयकर विभागाच्या छापेमारीनंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) म्हटले आहे की, त्याच्याविरोधात २० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर चोरीचे प्रकरण समोर आले आहे. सीबीडीटीने अशी माहिती दिली आहे की, अभिनेता सोनू सूद आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणी घेतलेल्या शोधादरम्यान करचुकवेगिरीशी संबंधित पुरावे सापडले आहेत. सीबीडीटीने अशी माहिती दिली आहे की अभिनेत्याने बनावट संस्थांकडून बनावट आणि असुरक्षित कर्जाच्या स्वरुपात बेहिशोबी रक्कम जमा केली होती.
सीबीडीटीने दिलेल्या माहिनुसार, सोनूच्या विविध ठिकाणांवर छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील काही ठिकाणांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आयकर विभागाने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमधील लखनऊ स्थित औद्योगिक समुहावर देखील छापेमारी आणि जप्तीची कारवाई केली आहे. एकूण ३ दिवसांपासून ही छापेमारी सुरू असून साधारण २८ ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली. यामध्ये मुंबई, लखनऊ, कानपूर, जयपूर, दिल्ली आणि गुरुग्राममधील ठिकाणांचा समावेश आहे.