धरणगाव (प्रतिनिधी) महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेत आज सेवापुर्ती सोहळा उत्साहात संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक एस. आर. महाजन व आदर्श क्रीडाशिक्षक व्ही. पी. महाले यांना निरोप देण्यात आला.
सेवापुर्ती सोहळ्याचे प्रास्ताविक पी. डी. पाटील यांनी केले. या सेवापुर्ती सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी एस. एस. चौधरी व धरणगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्ती माजी मुख्याध्यापक एस. आर. महाजन व आदर्श क्रीडाशिक्षक व्ही. पी. महाले यांचा सपत्नीक भेटवस्तु – पुष्पगुच्छ व अनमोल ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. धरणगाव तालुका क्रीडा शिक्षक संघाच्या वतीने महाले यांना शाल – पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शाळेतील उपक्रमशील शिक्षक पी. डी. पाटील यांनी सत्कारमूर्ती यांना सपत्नीक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले लिखित शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी, सावित्रीबाई फुले चरीत्र व सावित्रीबाईंचा जन्मोत्सव असे अनमोल ग्रंथ भेट दिले. सेवापुर्ती सोहळ्याचे प्रमुख अतिथी उपशिक्षणाधिकारी एस. एस. चौधरी, गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांनी दोघही सत्कार मूर्तींच्या सेवेविषयी गौरवपुर्ण प्रकाश टाकला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेचे पर्यवेक्षक जे. एस. पवार, तंत्रस्नेही शिक्षक एस. व्ही. आढावे यांनी सत्कारमूर्ती शिक्षकांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. सत्कारमूर्तींची सेवा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन केले.
सत्कारमूर्ती एस. आर. महाजन व व्ही. पी. महाले यांनी आपल्या मनोगतातून शाळेने आम्हाला भरपूर दिले. आमच्या हातुन चांगले विद्यार्थी घडले जे आज सरकारी नोकरीत उत्तमरित्या काम करीत आहेत. हीच आमच्या कामाची पावती आहे. आमचे सदैव प्रेम आमच्या शाळेवर राहील. आमच्या सुवर्णमहोत्सवी शाळेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असे प्रतिपादन केले. सेवापुर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका पी. आर. सोनवणे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सेवापुर्ती सोहळ्यानिमित्त त्यांनी केलेल्या सेवेचा गौरव केला. मागील काळातील प्रसंग सांगून शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच सेवापुर्ती सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. डी. पाटील व आभार एस. एन. कोळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.
















