भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ रेल्वे यार्डातून मुंबई येथे पोर्ट टर्मिनल्स (जेएनपीटी) येथे कंटेनर वाहून नेत असलेल्या मालगाडीचे सात कंटेनर रूळाखाली घसरल्याची घटना शुक्रवार (दि.९ जून) रोजी रात्री घडली. परंतू मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास हे कंटेनर पूर्ववत रेल्वे रूळावर आणण्यात यंत्रणेला यश आल्याची माहिती जनसंपर्क अधिकार्यांनी दिली.
या संदर्भात अधिक असे की, नागपूरहून जेएनपीटी बंदरावर कंटेनरगाडी निघाल्यानंतर भुसावळ यार्डात आली. शुक्रवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास कंटेनर गाडी यार्डातून बाहेर पडून मुंबईच्या पोर्ट टर्मिनल्सच्या दिशेने निघाली होती. परंतू इंजिनापासून काही अंतरावरील सात डबे रूळावरून अचानक खाली घसरले. त्यामुळे रेल्वे यार्डात अपघात झाल्याची धोक्याची सूचना देणारे सायरन वाजवण्यात आल्यानंतर घटनास्थळी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. या अपघातामुळे रेल्वे रूळ खराब झाल्याने ते रूळ व त्याखालील सिमेंटचे तुटलेले स्लिपर बदलण्याचे काम शंभराहून अधिक कर्मचार्यांनी शनिवारी पहाटेपर्यंत करीत 18 तासात मार्ग खुला केला. दरम्यान, रेल्वे यार्डात झालेल्या अपघाताची वरीष्ठ अधिकार्यांकडून चौकशी होणार असल्याचे कळते.