कोल्हापूर (वृत्तसंस्था) ‘संभाजीराजेंनी अपक्ष लढावं ही तर फडणवीसांची खेळी होती’, असा मोठा गौप्यस्फोट संभाजीराजे यांचे वडील शाहू छत्रपती (Chhatrapati Shahu) यांनी केला आहे. कोल्हापुरातील पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला.
संभाजीराजेंनी लढण्याआधीच तलवार म्यान केल्याने विविध नेत्यांच्या उलट सुलट प्रतिक्रया येत आहेत. अशातच संभाजीराजेंच्या माघाराविषयी त्यांचे वडील शाहू छत्रपती यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राजेंच्या माघारीला फडणवीसांना जबाबदार धरलं आहे. संभाजीराजेंनी अपक्ष लढावं ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची खेळी होती, असा गौप्यस्फोट शाहू छत्रपती यांनी केला आहे.
संभाजीराजेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्याचं विविध विषयांवर बोलणं झालं. संभाजीराजेंना अपक्ष लढण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपने भाग पाडलं. बहुजन मतांचं विभाजन व्हावं, यासाठी भाजपने ही खेळी खेळली, असा आरोपही शाहू छत्रपती यांनी केला. संभाजीराजेंना उमेदवारी न देऊन शिवसेनेने छत्रपती घराण्याचा अपमान केला, अशी टीका विरोधक करत आहेत. विरोधकांच्या या टीकेलाही छत्रपती शाहूंनी उत्तर दिली. “संभाजीराजेंना उमेदवारी दिली नाही म्हणजे छत्रपती घराण्याचा अपमान केला असं होत नाही. संभाजीराजेंची ती राजकीय भूमिका होती”, असं शाहू छत्रपती म्हणाले.