धरणगाव (प्रतिनिधी) येथील स्व. शरद बन्सी स्मृती फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या पहिल्या, जिल्हास्तरीय शरद बन्सी पत्रकारीता पुरस्कार २०२२ साठी, रावेर येथील उपक्रमशील जेष्ठ पत्रकार दिलिप रत्नाकर वैद्य यांची निवड करण्यात आल्याची घोषणा फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आली.
स्मृतीचिन्ह, सन्मान पत्र, १०००/-रु.ग्रंथसंपदा, शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. शरद बन्सी यांनी पत्रकारीतेच्या क्षेत्रात दिलेल्या प्रदीर्घ योगदानाबद्दल आणि त्यांच्या स्मृती चिरंतन रहाव्यात यासाठी, या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज, दि. २८ बुधवार रोजी, पी. आर. हायस्कूल येथे दुपारी ४ वाजता, मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ पार पडेल. शरद बन्सी यांनी शिक्षण, सहकार, पत्रकारीता आणि सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य मित्र असून, त्यांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. कार्यक्रमाला शिक्षक, पत्रकार, शरद बन्सीवर प्रेम करणाऱ्या नागरीकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.