नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची यूपीएच्या चेअरमनपदी निवडीची शक्यत वर्तवण्यात येत होती. शरद पवार हे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची जागा घेऊ शकतात. महाविकासआघाडीप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु झाले. मात्र आता दिवसभराच्या चर्चेनंतर राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण समोर आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याची चर्चा गुरुवारी दिल्लीत रंगली होती. राहुल गांधी जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने शरद पवार यांच्या नावाची चर्चा असून त्यांच्याकडे युपीएचं अध्यक्षपद सोपवलं जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. लवकरच शरद पवार युपीएचं अध्यक्षपद स्वीकारतील असा दावाही केला जात आहे. दरम्यान या सर्व घडामोडींवर पक्षाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. दुसरीकडे शिवेसनेने याबद्दल बोलताना राजकारणात काहीही होऊ शकतं असं सांगत शरद पवारांमध्ये राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचं सांगितलं होतं. “राष्ट्राचं नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता सध्या जर कुणामध्ये असेल तर ती शरद पवार यांच्यामध्ये आहे. प्रश्नांची तसंच देशाची जाण, लोकांची नाडी ओळखणं, खंबीरपणा या सर्व गोष्टी शरद पवार यांच्याकडे आहेत. त्यांचा अनुभव दांडगा आहे.” असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.
“युपीएच्या अध्यक्षपदाबाबत बोलायचं झालं तर, शिवसेना काही यूपीएची सदस्य नाही. त्यामुळे मी कसं काय याबाबत मत व्यक्त करू? महाराष्ट्रातील महाविकासआघाडीत आम्ही आहोत. पण अद्याप आम्ही युपीएचे सदस्य नाही. त्यामुळे मी त्यावर मतप्रदर्शन करणार नाही. भविष्यात राजकारणात काय होईल. हे मी आत्ता सांगू शकत नाही.” असं देखील यावेळी राऊत म्हणाले.