बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील चिखली येथे हवेमुळे वीज तारा एकमेकांवर घासल्याने जवळ असलेल्या शेडला आग लागून एका शेतकऱ्याचे तब्बल १ लाख ८० हजाराचे नुकसान झाले आहे.
चिखली येथील प्रकाश देवराम पाटील यांचे गावाजवळील शेतातील पत्रे व कुडाचे असलेले शेड जवळून वीज तारा गेल्या आहेत. रात्री दीड दोनचे सुमारास हवेमुळे तारांचा एकमेकास स्पर्श झाल्याने ठिणग्या पडून शेडला आग लागली. या आगीत शेडमध्ये असलेली कुट्टी कुटार, ठिबक नळ्या, पी व्ही सी पाईप,कांद्याचे वीस गोण्या ,रासायनिक खतांच्या चार गोण्या, शेती अवजारे, सबमर्सिबल पंपाचे केबल अश्या वस्तूंचे नुकसान झाले. रात्री आग लागल्याचे समजताच गावकऱ्यांनी शेतात येऊन गावातील पाण्याचे टॅकरच्या साहाय्याने आग विझवली. या आगीची पोलीस ठाण्यात अकस्मात आग म्हणून नोंद शेतकरी प्रकाश पाटील यांचे खबरीवरून घेण्यात आली आहे.