अमळनेर (प्रतिनिधी) शिंदे सरकारच्या जाहिरातीमुळे आमच्या ज्ञानात भर पडली, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. ते अमळनेरमध्ये बोलत होते.
राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे राज्य अधिवेशन शुक्रवारी अमळनेरात झाले. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, शिंदे सरकारच्या जाहिरातीमुळे आमच्या ज्ञानात भर पडली. तर जपची देशातील अनेक राज्यात सत्ता नाही केवळ 4 ते 5 राज्यात भाजप सत्तेत आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसची सत्ता होती गोव्यात काँग्रेसची सत्ता होती तेथील आमदार फोडून भाजपने सत्ता स्थापन केली आहे. आपल्या राज्यात जसे खोक्यामुळे उद्धव ठाकरेंचे सरकार गेले आणि खोके शब्द फेमस झाला तसाच कार्यक्रम त्यावेळी त्या राज्यामध्ये झाला असा आरोप शरद पवारांनी केला आहे. तर पत्रकार परिषदेत ईव्हीएम मशीनबाबत विचारले असता ते म्हणाले की, दिग्विजयसिंग यांनी ईव्हीएम द्वारे निकाल बदलले जाऊ शकतात, असे सिद्ध केले आहे, आणि म्हणूनच निवडणुकीची जुनी पद्धत असावी, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच शेतकरी मालाला कपाशीला भाव नाही यावर त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, अशी घोषणा सरकारने केली मात्र सरकार कमी भाव देत असल्याने उत्पादन खर्च देखील निघत नाही. त्यामुळे शासनाने एजन्सीमार्फत माल खरेदी करावा किंवा शेतकऱ्यांना अनुदान तरी द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील उपस्थित होते.