अमळनेर (प्रतिनिधी) थकीत कर्जापोटी पीपल्स बँकेने जप्त केलेली मालमत्ता परस्पर विकून अपहार केल्याने, डी.डी.केमिकल्सचे मालक अशोक पाटील यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक घुडकू पाटील (वय ४५) यांनी यांनी डी. डी. केमिकल्ससाठी शिरपूर पीपल्स बँकेकडून ४२ लाख रुपये मुदतीचे कर्ज, तसेच २० लाख रुपये खेळते भांडवल अशी रोख रक्कम घेतली होती. मात्र पाटील यांनी कर्ज न फेडल्याने बँकेने त्यांच्या मंगरूळ येथील औद्योगिक वसाहतीतील गट नंबर ६८३ ९ मधील प्लॉट नंबर ८३ च्या डी.डी.केमिकल्सवर सहाय्यक निबंधकांच्या परवानगीने जप्ती बोजा लावला होता. केमिकल युनिटची अपसेट प्राईस काढण्यासाठी अधिकारी औद्योगिक वसाहतीत गेले असता मशिनरी जागेवर आढळली नाही.
मशिनरी दुरुस्तीसाठी आदेशाने पाठवली आहे, असे खोटे सांगून अशोक पाटील याने उडवाउडवी केली. याबाबत शिरपुर पीपल्स बँकेचे वसुली अधिकारी नरेंद्र माळी यांनी पोलिसात २२ फेब्रुवारी २०२२ रोजी तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांनी तक्रार घेतली नाही. म्हणून बँकेने न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशाने अशोक पाटील यांच्याविरुद्ध फसवणुकीचा व जप्त मालमत्ता परस्पर विकून अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे करत आहेत.