जळगाव (प्रतिनिधी) चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संशयितांना संबंधित पोलीस ठाण्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात घरफोडीसह मोबाईल व जबरी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी तीन पथके तयार करुन रवाना केले होते.
पहिल्या पथकाने एरंडोल तालुक्यातील रवंजा येथून विठ्ठल साहेबराव देशमुख याला ताब्यात घेवून त्याच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील ६ हजारांचा मुद्देमाल तर दुसऱ्या पथकाने मालेगाव येथील इमरान उर्फ डोकोमो नाजिम अन्सारी व आरिफ इकबाल शहा या दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून दहा हजारांचा मोबाईल जप्त केला आहे.
तर तिसऱ्या पथकाने एजाज खान मजीद खान रा. शेंदुर्णी ता. जामनेर व फारुख रशिद शेख रा. नागदुली ता. एरंडोल या दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून १८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी एरंडोल शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, संदीप सावळे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, प्रितम पाटील, विजय पाटील, किरण चौधरी, नंदलाल पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन, ईश्र्वर पाटील, लोकेश माळी, अशोक पाटील यांच्या पथकाने केली.