मुंबई (वृत्तसंस्था) पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली.
खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. उद्धव ठाकरे आज दुपारी भांडुपमधील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि कुटुंबियांची भेट घेत त्यांना दिलासा दिला. सर्वांची विचारपूस केल्यानंतर काहीही काळजी करु नका, शिवसेना आणि मी स्वतः तुमच्यासोबत आहे,’ असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी निघताना दिलं. त्यानंतर पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांच्याबद्दल मला नक्कीच अभिमान आहे. कारण आजच्या राजकारणात बळाचा वापर सुरु आहे. बळ तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही इतरांना संपवण्याच्या मागे लागणार असाल तर दिवस हे सारखे नसतात. दिवस हे फिरतात. तुमचं काय होईल याचा विचार सुद्धा करणे भाजप आणि नड्डा यांनी करण्याची आवश्यकता आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. संजय राऊत माझे मित्र आहेत आणि बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांचा मला अभिमान आहे. त्यांचा गुन्हा काय होता? झुकेगा नहीं हे सिनेमात बोलणं खूप सोपं असतं पण संजय राऊतांनी ते सिद्ध करुन दाखवलं आहे. हुकूमशाहीसमोर न झुकता लढू शकतो ही एक ठिणगी संजय राऊतांनी टाकली आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
देशात भाजपा हा एकमेव पक्ष राहणार आहे असं ते म्हणाले हे विधान अत्यंत गंभीर आहे. त्यांच्या विधानात लोकशाही कुठे आहे का? राजकारण एक बुद्धीबळ असल्याचं आपण म्हणतो. पण यांच्याकडून फक्त बळाचा वापर केला जात आहे. बुद्धीचा वापर आता केला जात नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा दिवस फिरले तर तुमचं काय होईल याचा विचार जेपी नड्डा यांनी करावा”, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.