मुंबई (वृत्तसंस्था) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात संबोधित करताना महाविकास आघाडीविरोधात हल्लाबोल केला आहे. यावरुन आता राजकीय वाद उफाळला असून शिवसेना आणि मनसेमध्ये सोशल मीडियावर वॉर सुरु झाला आहे. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुस्लिम वेशातील फोटो शेअर करत मनसेवर निशाणा साधला आहे.
अंबादास दानवेंनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय…?
“कोरोना नंतरच्या काळात आज जनतेच्या पोटावर पोटतिडकीने बोलेल आणि त्यानुसार कृती करेल तो खरा लोकनेता…. आज जात, धर्म, प्रांत भेद करण्याची ही वेळ नाही. लोकांची रोजी रोटी हिसकावून घेतली गेली आहे. व्यवसाय बुडाले आहेत. नोकऱ्या जाऊन बेकारी वाढली आहे. महागाईचा आगडोंब भडकला आहे. दिवसेंदिवस दैनंदिन वस्तूच्या वाढत्या महागाईमुळे गोरगरिबांचा संसार विस्कटला आहे. यावर बोलायचे सोडून धार्मिक अराजक कसे माजेल यावर राज ठाकरे बोलले.”
“शिवतीर्थावर झालेल्या गुडी पाडवा स्नेह संमेलनात स्नेह वाढण्याऐवजी जाती धर्मात द्वेष वाढवण्याचे काम मनसेप्रमुखांनी केले आहे. ह्या त्यांच्या भाषणातून मनसैनिकाना आज काय मिळाले असेल ते केवळ नैराश्य आणि काळजी…!” “राज ठाकरे यांनी केंद्राच्या लोकशाही विरुद्ध धोरणावर आसूड ओढले असते तर आपल्या कार्यकर्त्यांकडून टाळ्यांचा कडकडाट झालेला बघायला मिळाला असता पण तसे दिसले नाही. शेवटी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रचंड दूरदृष्टी असलेले नेते होते. याची जाणीव आज संबंध महाराष्ट्राला होतेय”.
















