गडचिरोली (वृत्तसंस्था) कुरखेडा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेना शहरप्रमुखाची चाकूने सपासप वार करून पतीने निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना १५ सप्टेंबरला पहाटे घडली. चारित्र्याच्या संशयातून हे थरारक हत्याकांड झाल्याचे कळते. तर संशयित आरोपी पतीने पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे. राहत ताहेमीम शेख (वय ३०) असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
राहत शेख ही शिवसेना (उबाठा) गटाची युवती सेना शहरप्रमुख होती. ती आरोपी पती ताहेमीम वजीर शेख (वय ३८) याच्यासह कुरखेडा शहरातील डॉ. आंबेडकर वॉर्डात मागील काही वर्षांपासून वास्तव्याला होती. या दाम्पत्यांना ८ व ५ वर्षांचे दोन अपत्यसुद्धा आहेत. पती हा नेहमीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी भांडण करीत होता. शुक्रवारी भांडण विकोपाला गेल्याने रागाचा भरात आरोपी पतीने पत्नीचा गळा चिरत पोटावर चाकूने वार निर्घृण करून हत्या केली. आरोपी ताहेमीम शेख हा रजेगाव (जि. गोंदिया) येथील रहिवासी असून, मागील काही वर्षांपासून तो सासूरवाडी असलेल्या कुरखेडा येथेच कुटुंबासह वास्तव्याला होता. दुमजली असलेल्या घरात खाली सासू-सासरे तर वरच्या माळ्यावर पती-पत्नी, अपत्य व आरोपीचे वडील राहत होते. शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास त्याने हे हत्याकांड घडवून आणले.
यावेळी मुले व वडील घरीच होते. वडील दुसऱ्या खोलीत असल्याने त्यांना घटनेची माहिती कळू शकली नाही. तर खाली राहणाऱ्या सासऱ्याची प्रकृती अस्वस्थ असल्याने ते येथील उपजिल्हा रुग्णालयात होते. त्यांच्या सोबत त्यांची पत्नीसुद्धा होती. ते पहाटे ४ वाजता रुग्णालयातून घरी चहा आणण्यासाठी आले व मुलीला चहा करून मागण्याकरिता तिच्या खोलीत गेले असता मुलगी रक्ताचा थारोळ्यात निपचीत पडून असल्याचे दिसून आले.
आरोपीने पहाटेच कुरखेडा पोलीस स्टेशन येथे पोहोचत गुन्ह्याची कबुली देऊन पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. मृतकाचे वडील नजत सय्यद यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास कुरखेड्याचे ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक वर्षा बोरसे, महिला पोलीस उपनिरीक्षक एस. आर. अवचार करीत आहेत. दरम्यान, पत्नीची हत्या केल्यानंतर ताहेमीम वजीर शेख याने नदीवर जाऊन अंघोळ केली आणि रक्ताने माखलेले कपडे धुतले. यानंतर तेथून त्याने सरळ पोलिस ठाणे गाठून संपूर्ण हकीकत सांगितली. त्यामुळे पोलिसही हादरून गेले.
दरम्यान, संशयित आरोपी पती ताहेमीम वजीर शेख याला काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधल्या रायपूर येथे हरणाची शिंगे विक्री प्रकरणात त्यास अटक झाली होती. १५ दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून आलेला होता. त्यानंतर त्याने पलीला निर्दयीपणे संपवले. पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर पोलिसांनी त्याला लगेच अटक केली.