औरंगाबाद (वृत्तसंस्था) आशिष शेलार औरंगाबाद इथं पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक तयारीसाठी आले होते. शेलार म्हणाले, शिवसेनेच्या हिंदुत्वाबाबत शंका निर्माण झाली आहे. सेनेला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर ही द्यावीच लागतील. हिंदुत्वाची गर्जाना करणाऱ्या सेनेच्या भगव्याचं आता शुद्धिकरण करण्याची गरज असल्याची सडकून टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
भाजपच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनावर चौफेर हल्ला चढवला होता. मात्र आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर घणाघाती हल्ला चढवला आहे. शिवसेनेच्या भगव्याचं शुद्धीकरण करण्याची गरज असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. शेलार पुढे म्हणाले, संजय राऊत यांची वृत्ती लोकशाही विरोधी इंग्रजी राजवटीतली आहे. पदविधर निवडणुकीत राष्ट्रवादीला उत्तर द्यावे लागेल. मराठवाड्यात शिक्षण व्यवस्था खिळखिळी झाली आहे. ३० शिक्षकांनी लॉकडाऊन मध्ये आत्महत्या केली. आजही यांना मदत मिळाली नाही. या शिक्षकांच्या मृत्यूला जबाबदार कोण याचे उत्तर द्यावे लागेल. शैक्षणिक संस्थांना टप्याटप्याने भाजपने अनुदान सुरू केले होते. मात्र या सरकारने अजून अनुदान दिलेलं नाही. शिक्षकांना काळी दिवाळी साजरी करावी लागली. अंधारात ढकलणाऱ्या सरकारचा बदला घेण्याची पदवीधर निवडणूक ही एक संधी आहे.
मराठवाड्याची महत्वाची वॉटर ग्रीड योजना आम्ही सुरू केली. मात्र ठाकरे सरकारने ही योजना बासनात गुंडाळली. कोरोनाच्या काळात राज्य सरकार सपशेल फेल ठरलं आहे. पक्ष विरोधी वक्तव्य करू नका नाही तर आम्ही कडक भाषेत उत्तरं देऊ असा इशारा आशिष शेलार यांनी जयसिंग राव गायकवाड यांना दिला.