जळगाव (प्रतिनिधी) चांदीच्या पायल पाहण्याच्या बहाण्याने दोन महिलांनी गोयल ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश केला. त्यातल्या एका महिलेनं पायल पाहण्याचं नाटक केलं, तर दुसऱ्या महिलेनं फोनवर बोलत असताना काऊंटरच्या ड्रॉवरमधून सोन्याचे पेंडल चोरी केले. पेंडलचं वजन २० ग्रॅम आणि किंमत सुमारे १ लाख ४५ हजार रुपये होती. ही घटना २८ जानेवारी रोजी, दुपारी पावणेतीन वाजता घडली आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. पोलिसांनी ते फुटेज जप्त करून तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी शनिपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गोयल ज्वेलर्स हे विश्वनाथ हनुमानदासजी अग्रवाल यांचं दुकान असून, त्यांचा मुलगा प्रशांत अग्रवाल दुकानात काम करत होता. त्या दिवशी दुपारी, प्रशांत कामानिमित्त बाहेर गेला होता. त्याचवेळी बुरखा घातलेल्या दोन महिलांनी दुकानात प्रवेश केला. एक महिला पायल बघत असताना दुसरी महिला फोनवर बोलत होती. काही वेळाने, फोनवर बोलणारी महिला पायल बघणाऱ्या महिलेकडे मोबाईल देऊन दुकानातून बाहेर गेली, आणि पायल बघणारी महिला काहीच न सांगता दुकानातून निघून गेली.
फोनवर बोलतांना उघडला ड्रॉवर
अग्रवाल यांना दोन्ही महिलांवर संशय आल्याने त्यांनी दुकानातील सामानाची पाहणी केली. यावेळी त्यांना काऊंटच्या ड्रॉवरमध्ये लहान मुलांचे सोन्याचे दागिने ठेवलेल्या डब्ब्यांमधील एक डबी दिसून आली नाही. त्यांनी लागलीच सीसीटीव्ही फुटेज बघितले असता, त्यामध्ये फोनवर बोलणारी महिला ही ड्रॉवरमधून सोन्याचे दागिने ठेवलेली डबी चोरतांना दिसून आली.
लक्ष केंद्रीत करुन मारला डल्ला
अग्रवाल यांनी दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी ५१.८६ ग्रॅम वजनाचे लहान मुलांचे वेगवेगळे सोन्याचे दागिने खरेदी केले होते. त्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याने दागिने ठेवलेली डबी बुरखा घातलेल्या महिलेने लक्ष केंद्रीत करुन चोरुन नेली. त्यानुसार अग्रवाल यांनी बुधवारी शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दोघ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
त्या दोघ महिलांचा घेतला जातोय शोध
घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दागिने चोरतांनाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यानुसार बुरखा घातलेल्या दोघ महिलांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.