जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील धानवड-पिंपळे शेत शिवारात मानवी शरिराचे अवशेष मिळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन ते अवशेष जिल्हा रुग्णालयात नेले आहे. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे.
जळगाव तालुक्यातील धानवड- पिंपळे शिवारातील शेतात जात असलेल्या तरुणाला काल दि. २९ जानेवारी रोजी शेतात मानवी शरिराचे काही अवशेष दिसून आले. या तरुणाने याबाबतची माहिती पोलीस पाटील सविता ग्यान व चंद्रकांत आवारे यांना दिली. त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, त्याठिकाणी मानवी शरिरातील कवटी आणि हातापायासह इतर अवशेष दिसून आले. त्यांनी लागलीच याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळविले. पंचनामा करुन अवशेष आणले रुग्णालयात मानवी अवशेष आढळून आल्याचे समजताच पोलीस निरीक्षकांनी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्याठिकाणाहून त्यांनी मानवी अवशेषांचा पंचनामा करुन ते जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी जप्त केलेल्या अवशेषांचे अवशेष तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणी अहवाल आल्यानंतर या घटनेचा उलगडा होणार आहे. ज्याठिकाणी मानवी शरिराचे अवशेष मिळून आले त्याठिकाणी शेतशिवार आहे. पोलिसांकडून जनावरांनी दफन केलेले अवशेष उकरुन काढून ते याठिकाणी फेकल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला, परंतु या परिसरात यापुर्वी कधीही मृतदेह दफन केले नसल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे पोलिसांकडून या घटनेची गांर्भीय लक्षात घेवून त्याची कसून चौकशी केली जात आहे.