बंगळुरु (वृत्तसंस्था) अल्पवयीन तरुणीवर पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल १७ जणांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकात उघडकीस आला आहे. १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर गेल्या पाच महिन्यांपासून बलात्कार, लैंगिक अत्याचार तसंच तस्करी केल्याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये मुलीच्या मावशीचाही समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच महिन्यांपासून बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि तस्करी केल्या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कर्नाटकातील चिकमंगळुरु जिल्हा बालकल्याण समितीच्या सभापतींनी ३० जानेवारीला १७ जणांविरोधात बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार १५ वर्षांच्या मुलीवर पाच महिने १७ जणांकडून बलात्कार आणि लैंगिक अत्याचार करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तीन वर्षापूर्वी आईचा मृत्यू झाल्यानंतर मावशीसोबत राहत होती. पीडित तरुणी दगड फोडणाऱ्या कंपनीत काम करत असताना तिची ओळख गिरीश नावाच्या बस चालकासोबत झाली. त्याने तिच्यावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केले. गिरीशने तिचा नंबर अभी नावाच्या आरोपीला दिला. अभीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिचे फोटो, व्हिडीओ काढले आणि ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या मित्रांनीही पीडितेवर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पीडित तरुणी ही तिच्या मावशीसोबत राहत होती. मुलीवर वारंवार होणाऱ्या बलात्काराबद्दल तिला माहिती होतं. पोलिसांनी तिलाही अटक केली आहे. आरोपींची ओळख पटली असून अभी, गिरीश, विकास, मणिकांत, संपत, अश्वतगौडा, राजेश, अमित, संतोष, दीक्षित, संतोष, निरंजन, नारायण गौडा, अभी गौडा, योगेश, मुलीची मावशी आणि दगड फोडणाऱ्या कंपनीच्या मालकाचा समावेश आहे.