नागपूर (वृत्तसंस्था) नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना घडली. नागपूर ग्रामीणच्या खापरखेडा या मुख्य बाजारपेठेत बुधवारी रात्री एका ३० वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. अत्यंत निर्घुणपणे तरुणाची हत्या करण्यात आली. बाजार परिसरातील राजबाबा बियर बार समोर ही घटना घडली आहे. प्रशांत घोडेस्वर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. किरकोळ वादातून या व्यक्तीची गळा चिरून हत्या करण्यात आली.
बुधवारी रात्री उशिरा खापरखेडा येथे बाजार परिसरातील राजबाबा बिअर बारसमोर ३० वर्षीय तरुणाची गळा चिरुन हत्या करण्यात आली. प्रशांत घोडोस्वार असं या तरुणाचं नाव असल्याची माहिती आहे. रात्री उशिरा प्रशांत घरी जात असताना पाच आरोपींनी त्याला राजबाबा बिअर बारसमोर अडवून धरले. त्यावेळी आरोपींनी जुना वाद उकरुन काढत आधीच सोबत आणलेल्या धारधार शस्त्राने प्रशांत घोडेस्वर याच्या गळ्यावर वार केले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर खापरखेडा परिसरात अत्यंत तणावाचं वातावरण आहे. घटनेची माहिती समजताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. मात्र, तोपर्यंत प्रशांतचा मृत्यू झालेला होता. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवून हत्येचा तपास सुरु केला आहे.
बुधवारी ही घटना घडल्यानंतर सर्व आरोपी फरार आहेत मात्र सीसीटीव्हीमध्ये ते कैद झाले आहेत. याच आधारावर आरोपींचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे. केवळ जागेच्या वादातून ही घटना घडली की त्यामागे आणखी काही प्रकार आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. नागपूर ग्रामीणमधील खापरखेडा परिसर मात्र या घटनेनंतर चांगलाच हादरला आहे.