धुळे (प्रतिनिधी) धुळे शहरातील (Dhule Police) पोलिस प्रशिक्षण केंद्रात ६९ प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्न विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विषबाधा झालेल्या या प्रशिक्षणार्थी पोलिसांना धुळ्यातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालाच्या जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तात्काळ या सर्व बाधित प्रशिक्षणार्थी पोलीस जवानांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय हिरे महाविद्यालय या ठिकाणी दाखल करण्यात आले. बाधित झालेल्या या 69 पोलीस जवानांपैकी 29 पोलीस जवानांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना उपचारासाठी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर बाकी 40 पोलीस जवानांना प्राथमिक उपचारानंतर बरे वाटू लागल्याने त्यांना पुन्हा पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये पाठवण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी रुग्णालयात धाव घेत बाधित पोलीस जवानांची पाहणी केली व त्यांची विचारपूस देखील केली आहे. या संदर्भातील संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण घेणाऱ्या पोलीस जवानांना विषबाधा कशातून झाली याचा तपास धुळे शहर पोलिसांतर्फे करण्याचे काम सुरू करण्यात आले असून लवकरच या संदर्भातील उलगडा होईल असे पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.