यवतमाळ (वृत्तसंस्था) अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. पोलिसांनी तपास चक्रे वेगात फिरवून ४८ तासांत आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी एकप्रकारे सिरीयल किलर असून त्याने दहा खून केले आहेत. तसेच, त्याच्यावर इतर पंधरा गुन्ह्याची नोंद राज्यातील पोलिस ठाण्यात आहे. याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी गुरुवारी पत्रपरिषद घेऊन ही माहिती दिली. अजीज खान महंमद खान पठाण (३९, ता. उमरखेड ) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी सात वर्षांपूर्वीचा सिरियल किलर असल्याचे समोर आले असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
१० ऑक्टोबर रोजी येथील एका शाळेत जाण्यासाठी निघालेल्या अकरा वर्षीय मुलीस फूस लावली. माझी मुलगी तुझ्या वर्गात आहे. मी तुला शाळेत सोडून देतो, असे म्हणून आरोपीने जबरदस्तीने मुलीला दुचाकीवर बसवून नेले. शहराजवळील करोडी पांदण रस्त्याकडे दुचाकी घेऊन निर्जनस्थळी नेत जबरीने अत्याचार केला. तसेच कुणाला सांगितले तर जिवे मारेल, अशी धमकी देत पुसद मार्गावरील मंदिराजवळ आणून सोडले. या घटनेमुळे शाळा प्रशासन व तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.
मोबाइलच्या लोकेशनवरून व सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आढळलेल्या मोटरसायकलच्या फुटेजवरून आरोपीस उमरखेडजवळील एका गावातून अटक केली. आरोपीवर यापूर्वी १० खून व इतर १२ गंभीर गुन्ह्यांची नोंद राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत आहे. गत महिन्यात २७ सप्टेंबरला जामिनावर आरोपीची सुटका झाली होती. त्याने टार्गेट करून मुलगी शोधायची म्हणून रेकी करून हे कृत्य केल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी सांगितले.
दरम्यान, आरोपीवर दहा मर्डर, तीन बलात्कार आणि नऊ जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे मराठवाडा- विदर्भातील पोलिस ठाण्यांमध्ये नोंद असून तो सराईत गुन्हेगार आहे. नुकताच तो कारागृहातून पॅरोलवर गावी आला होता. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी कुख्यात निघाल्याने खळबळ उडाली आहे.
हा खटला जलदगती न्यायालयात चांगले सरकारी अभियोक्ता मागवून आरोपीला लवकर जमानत मिळू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी, पोलिस अधिकारी विनायक कोते, पोफाळी ठाणेदार दीपक ढोमणे, उमरखेड ठाणेदार शंकर पांचाळ, सपोनि सतीश खेडकर उपस्थित होते. याबाबतचे वृत्त आज स्थानिक माध्यमांनी दिले आहे.