जालना (वृत्तसंस्था) भरधाव ट्रॅक्टर व दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील बाप-लेकासह तिघेजण जागीच ठार झाले. ज्ञानेश्वर साहेबराव साबळे (वय ३८), युवराज ज्ञानेश्वर साबळे (वय १४, दोघे रा. निकळक) आणि आत्माराम कारभारी म्हसके (वय ३०, रा. अकोला ता. बदनापूर) असं तिघा मृतांचे नावे आहेत. हा अपघात इतका भीषण होता की अक्षरशा: बाप-लेकाचे शिर धडावेगळे झाले होते.
नेमका कसा झाला अपघात ?
निकळक येथील ज्ञानेश्वर साबळे हे मोलमजुरी करतात. शुक्रवारी रात्री ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील मात्रेवाडीजवळील दुचाकीवरून पेट्रोल भरण्यासाठी संत निरंकारी पेट्रोलपंपाकडे जात होते. त्याच वेळी बोरमशीनचे साहित्य असलेला एक विना क्रमांकाचा ट्रॅक्टर जालन्याहून बदनापूरकडे जात होता. ज्ञानेश्वर साबळे यांची दुचाकी डिव्हॉयडरमधून पेट्रोलपंपाळकडे जात असताना बदनापूरकडे भरधाव जाणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला उडविले. या अपघातात दुचाकी ट्रॅक्टरचे तोंड व ट्रॉलीमध्ये फसल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला.
बाप-लेकाचे शिर धडावेगळं !
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी ट्रॅक्टरमध्ये फसलेली दुचाकी व मृतदेह जेसीबीच्या मदतीने बाहेर काढले. हा अपघात इतकी भीषण होता की अपघातग्रस्त दुचाकी ट्रॅक्टरमध्ये फसली. त्यानंतर ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्यालगत असलेल्या लोखंडी इलेक्ट्रीक पोलला जाऊन धडकले. त्यामुळे फसलेल्या साबळे पिता-पुत्राचे शीर ट्रॅक्टर व इलेक्ट्रिक पोलच्या दाबामुळे धडावेगळे झाले. मृत ज्ञानेश्वर साबळे यांना युवराज हा एकच मुलगा आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, व मुलगी असा परिवार आहे.
पेट्रोल भरण्यासाठी गेले अन् परतलेच नाहीत !
ज्ञानेश्वर साबळे यांना शिवराज हा एकुलता एक मुलगा होता. दोघे पिता-पुत्र व आत्माराम म्हस्के पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोलपंपावर गेले होते. मात्र, एक बोर घेणारा ट्रॅक्टर त्या पंपाकडे अचानक आल्यामुळे त्यांचा अपघात झाला व तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळं बदनापूर तालुक्यातील अकोला आणि निकळक या दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली होती.