रांची (वृत्तसंस्था) झारखंडची राजधानी रांचीमध्ये एका तरुणीवर सहा जणांनी बलात्कार केल्याची घटना घडली. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर तिच्या मैत्रिणीला फोन करून बोलावण्यात आलं. त्यानंतर तिच्यावरही बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून सहावा आरोपी फरार आहे.
तुपुदाना परिसरात वास्तव्यास असलेली तरुणी तिच्या नणंदेकडे गेली होती. गुरुवारी रात्री नणंदेनं तरुणीला एका तरुणासोबत घरी पाठवलं. तरुणीला घरी सोडण्यासाठी निघालेल्या तरुणानं त्याच्या पाच मित्रांना बोलावलं. सहा जणांनी तरुणीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. सहा जण तरुणीवर बलात्कार करून थांबले नाहीत. त्यांनी तिच्या सुटकेसाठी एक अट ठेवली. तुझ्या मैत्रिणीला बोलव, तरच तुला सोडू, असं आरोपींनी पीडितेला सांगितलं. घाबरलेल्या पीडितेनं तिच्या मैत्रिणीला फोन केला. थोड्याच वेळातं मैत्रीण पोहोचली. त्यानंतर सहा जणांनी आळीपाळीनं तिच्यावर बलात्कार केला. सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपींनी दोन्ही तरुणींना धमकी दिली. यानंतर ते तिथून निघून गेले. आरोपी निघून जाताच पीडित तरुणींनी थेट पोलीस ठाणं गाठलं. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली. आरोपींना पकडण्यासाठी छापे टाकले. पाच आरोपी पकडले गेले. तर सहाव्याचा शोध सुरू आहे.