चाळीसगाव (प्रतिनिधी) चार दिवसांपूर्वीच घडलेली घटना अजून ज्वलंत असतानाच शहरातील आनंदवाडी येथील चार वर्षीय अल्पवयीन मुलीला बिस्किट पुड्याचे आमिष दाखवून एकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, चाळीसगाव शहरातील आनंदवाडी येथील चार वर्षीय अल्पवयीन मुलीला बिस्किटचा पुड़ा खायला घेऊन देतो असे सांगून चाळीसगाव रेल्वे स्थानकाजवळ घेऊन गेला. व तिच्यावर अत्याचार केल्याची थरारक घटना काल रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी सावळाराम भानुदास शिंदे रा. लोंढरे ता. नांदगाव जि. नाशिक या आरोपीला ताब्यात घेतले असून त्यावर भादवी कलम ३६३, ३६६ (अ), ३७६ (एवी) व पोस्को कायदा अंतर्गत ४, ५ (एम), ६, ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी हा पिडीतांचा दुरचा नातेवाईकच असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के के पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि विशाल टकले हे करीत आहेत.