नाशिक (वृत्तसंस्था) शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्यावर सोमवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला आहे. चार अज्ञात हल्लेखोरांनी कोकणे यांच्यावर पाठीमागून धारदार शस्त्राने वार केला.
बाळा कोकणे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. सोमवारी रात्री साडे दहा-पावणे अकरा वाजेच्या सुमारास बाळा कोकणे हे त्यांच्या दुचाकीने एमजीरोडवरून जात होते. यावेळी चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाठीमागून धारदार शस्त्राने हल्ला केला. यामुळे कोकणे रक्तबंबाळ झाले. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने त्यांना सरकारवाडा पोलीस ठाण्याजवळील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हल्ला नेमका कोणी व का केला?, हे अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने या हल्ल्यात कोकणे थोडक्यात बचावले आहेत. दुसरीकडे बाळा कोकणे यांच्यावरील हल्ल्यानंतर शालिमार येथील शिवसेना कार्यालय, खासदार निवासस्थान आणि संपर्क कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.