पहूर ता. जामनेर/ रावेर (प्रतिनिधी) मध्यरात्री घरात झोपलेल्या महिलेला दरवाजा वाजवून बाहेर बोलवित विनयभंग केल्याच्या दोन घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. या प्रकरणी पहूर ता. जामनेर आणि रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहूर परिसरातील एका गावातील महिला नेहमी प्रमाणे झोपलेली होती. राम धनराज चव्हाण याने मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास पिडीत महिलेच्या घराचा दरवाजा ठोठावला. पिडीत महिलेने दरवाजा उघडून एवढ्या रात्री काय काम आहे?, असे विचारले असता राम चव्हाण याने अश्लिल संभाषण केले. या प्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ प्रशांत विरणारे हे करीत आहेत.
दुसरी घटना रावेर तालुक्यातील एका गावात घडली आहे. ३० वर्षीय महिला घरात झोपलेली असतांना मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास कैलास सुरेश अटकाळे याने दरवाजा वाजवला. पिडीत महिलेने दरवाजा उघडताच कैलास घरात शिरला आणि त्याने महिलेसोबत अंगलट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पिडीत महिलेने पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. नितीन डाबरे हे करीत आहे. दरम्यान, संशयितास पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.