मुंबई (वृत्तसंस्था) ड्रग्ज माफिया ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर सगळ्यात आधी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात पोहोचल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे याबाबत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी देखील आरोप केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
मला पळवून नेलं..कोणाचा हात आहे सर्व सांगेन !
मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटील याला ताब्यात घेतलं आहे. 2 ऑक्टोबर 2023 रोजी ललित पाटील हा पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. ललित पाटील हा चेन्नई येथे लपून बसल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने चेन्नई गाठून सापळा रचला आणि ललित पाटीलला अटक केली. साकिनाका पोलिसांच्या टिमने मोठी कामगिरी केली आहे. दरम्यान ललित पाटील याला वैद्यकीय चाचणीसाठी अंधेरी येथे आणण्यात आले. यावेळी त्याने माध्यमांच्या कॅमेरासमोर मोठा गौप्यस्फोट केला आहे. मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवून नेलं..कोणाचा हात आहे सर्व सांगेन असा गौप्यस्फोट ललीत पाटीलने केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कॅमेरासमोर ललीत पाटीलने हा गौप्यस्फोट केला आहे.
श्रीलंकेत जाण्याच्या होता तयारीत !
ललीत पाटील पुण्याहून नाशिकला गेला होता असे समोर येत आहे. नाशिकनंतर तो इंदौरला गेला. इंदौरनंतर तो गुजरात सुरतला गेला. यानंतर तो पुन्हा नाशिकला आला. यानंतर धुळे, संभाजीनगर, कर्नाटक, बंगळूर, चैन्नईपर्यंत प्रवास केला. यानंतर तो श्रीलंकेत जाण्याच्या तयारीत होता, असे सांगण्यात येत आहे. ललीत पाटीलला या प्रवासात त्याला कोणी मदत केली, टुरीस्ट गाडी कोणी करुन दिली, त्याच्यासोबत कोण होते? या सर्वांची मुंबई पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर सगळ्यात आधी चाळीसगावात पोहोचला !
ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर सगळ्यात आधी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात पोहोचला. धुळ्यानंतर छत्रपती संभाजीनंतर त्यानंतर गुजरातमधील जामनगरमध्ये जाऊन तीन दिवस राहिला. मुंबई पोलिसांची एकूण पाच पथक त्याच्या मागावर होती. गुजरातमधून ललित पाटील समृद्धी महामार्ग पकडून सोलापुरात आला आणि त्यानंतर त्याने कर्नाटकात प्रवेश केला. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये अखेर ललित पाटीलला अटक करण्यात आलीय.ललित पाटील बेंगलूरूमधून परदेशात पळण्याच्या तयारीत होता अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच ललित पाटील चाळीसगावात कुणाकडे गेला होता?, त्याला कुणी आश्रय दिला होता?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
ललित पाटीलची नार्को टेस्ट करा : खडसे !
राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. धुळे आणि चाळीसगांव ला ललित पाटील तीन दिवस थांबला होता अशी माहिती आहे. तो येथे नेमका कशासाठी आला होता याची चौकशी व्हावी. यानिमित्ताने ललित पाटीलचं जळगाव कनेक्शन होते. त्यामुळे त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे. त्याला कोणी-कोणी मदत केली. तो कुणाच्या सांगण्यावरून जळगावात आला?, कुणाकडे राहिला?, त्याला कोण मार्गदर्शन करत होते. यासह आदी प्रश्नांची उत्तरं मिळवायची असतील तर ललित पाटीलची नार्को टेस्ट झाली पाहिजे, असेही एकनाथराव खडसे यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीसोबत बोलतांना म्हटले आहे.
मुंबईतील क्रूझ पार्टी प्रकरणातील एनसीबीचा वादग्रस्त पंच किरण गोसावीही आला होता जळगाव जिल्ह्यात !
सन २०२१ मधील मुंबईतील क्रूझ पार्टी प्रकरणातील एनसीबीचा वादग्रस्त पंच किरण गोसावी फरारी असताना त्याने जळगावात मुक्काम केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. विशेष म्हणजे गोसावीच्या अटकेबाबत पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जळगावचा उल्लेख केल्यामुळं या चर्चेला अधिकच उधाण आले होते. एवढेच नव्हे तर, गोसावी हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी असल्याचे देखील माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता ललित पाटील यांचा देखील तीन दिवस चाळीसगावात मुक्कामी असल्याचा आरोप खडसे यांनी केल्यामुळे प्रत्येकवेळी चाळीसगाव कनेक्शन समोर येत असल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.