भुसावळ (प्रतिनिधी) येथील श्रीराम नगरात गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करीत त्यांचा गळा दाबून शिवीगाळ करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, बाजारपेठ स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भास्कर घायतड हे २६ रोजी साडेबारा वाजेच्या सुमारास श्रीराम नगर परिसरात हनुमान मंदिराजवळ गस्त घालत असताना त्याचवेळी विनानंबरच्या दोन दुचाकी व चारचाकी वाहन त्यांना आढळून आले. याबाबत विचारणा केली असता निखिल राजपूत, गोलू कोल्हे, नकुल राजपूत, अक्षय न्हावकर उर्फ थापा, अभिषेक शर्मा, आकाश पाटील, निलेश ठाकूर व एक अज्ञात यांनी घायतड यांचा गळा दाबून हल्ला केला तसेच शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी आरोपींविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर आरोपी पसार झाले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये करीत आहे.