नांदेड (वृत्तसंस्था) नांदेड (Nanded) शहरातील एका लॉजमध्ये महिला डॉक्टरने आत्महत्या (Woman doctor commit suicide in lodge) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित महिला डॉक्टर मागील दोन दिवसांपासून याच लॉजमध्ये राहत होती. लॉजमधील रुमचा दरवाजा बराच वेळ न उघडल्यामुळे व्यवस्थापनाने पोलिसांना बोलावलं, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे नांदेड शहरात खळबळ उडाली आहे.
विद्या सुंकवाड यांनी 22 मार्च रोजी नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील पंजाब लॉजमध्ये एक रुम बुक केली होती. 23 मार्च रोजी सकाळी त्या उठून बाहेर गेल्या आणि पुन्हा आपल्या रुमवर परत आल्या. मात्र 24 मार्च रोजी सकाळी त्या बाहेर न आल्यामुळे लॉजच्या व्यवस्थापनाने दार वाजवले, तेव्हा आतून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळानंतर पुन्हा एकदा लॉज व्यवस्थापनाने दरवाजा ठोठवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद न मिळाल्याने पंजाब लॉज व्यवस्थापनाने वजिराबाद पोलिसांना याबाबत माहिती दिली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले.
आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट
पोलिसांनी दार तोडले तेव्हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. याबाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने नांदेड शहरात खळबळ उडाली आहे. महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.