मुंबई (वृत्तसंस्था) नुकताच राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल जाहीर झाला असून या निकालात सर्वात मोठी चूक उघडकीस आली आहे. मृदुल रावत हा विद्यार्थी एनटीएने जारी केलेल्या गुणपत्रिकेत नापास झाल्याचे दिसून आले. मात्र, एसटी कॅटेगरीतून तो देशात पहिला आल्याचे समोर आले आहे. पुनर्विचारानंतर ही चूक उघडकीस आली.
नीट परीक्षेत नापास झाल्याचं दाखवण्यात आल्यानंतर या विद्यार्थ्याने निकालावर आक्षेप घेत, ओएमआर शीट आणि उत्तरपत्रिका (Answer Key)च्या आधारावर निकालाला आव्हान दिलं. त्यानुसार पुन्हा तपासणी करण्यात आल्यावर तो एसटी कॅटेगरीत देशात अव्वल असल्याचं समोर आलं.
मृदुलने म्हटले की, एनटीएच्या निकालातील माझ्या गुणांनुसार मी नीट २०२० परीक्षेत नापास झालो होतो. या गुणांसह कोणतंही वैद्यकीय महाविद्यालय मिळणार नव्हतं. यामुळे मला अक्षरश: रडू येत होतं व मी नैराश्यात गेलो होतो. कारण मला खात्री होती की मी नीट परीक्षा ६५० गुणांसह उत्तीर्ण होणारच. परंतू हा निकाल पाहिल्यानंतर मला मोठा धक्काच बसला. यानंतर मी एटीएच्या निकालाला आव्हान दिलं व पुन्हा तपासणी झाल्यावर माझा खरा निकाल समोर आला. एनटीएने चूक मान्य केल्याने मी आनंदी आहे. मी ६५० गुणांसह एसटी कॅटेगरीत देशात अव्वल आहे. तर, सर्वसाधरण श्रेणीत माझा देशात ३५७७ वा क्रमांक आहे.