सांगली (वृत्तसंस्था) सोन्याची अंगठी मागितली म्हणून प्रियकराने प्रियसीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील भिकवडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी प्रियकराला अटक करण्यात आली आहे. ताई सचिन निकम (वय 32) असे हत्या झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. तर, सर्जेराव पवार (वय 31) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सराफ व्यवसाय करणाऱ्या राहुल सर्जेराव पवार याचे ताई सचिन निकम नावाच्या महिलेशी प्रेमसंबंध होते. ताई निकमचा मृतदेह भिकवडीतील येरळा नदीपात्रात ६ जून रोजी आढळून आला होता. तेव्हा ही आत्महत्या नसून खूनाचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर तपासात ताई निकम आणि राहुल पवार यांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर, पोलिसांनी राहुल पवार याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने खुनाची कबूली दिली. मयत ताई निकम ही विटा येथे भाड्याच्या घरात राहत होती व येथील हॉटेलमध्ये भाकरी, चपाती करण्याचे काम करत होती. ताई आणि राहुल याचे सुमारे दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते.
3 मे रोजी ताई निकम ही राहुलच्या दुकानात आली होती. तिने राहुलकडे तिच्या वाढदिवासाकरिता एक ग्रॅम सोन्याची अंगठी मागितली होती. मात्र राहुलने यास नकार दिला होता. अंगठी न दिल्याच्या कारणावरून तिने प्रेम संबंधाबाबत त्याच्या वडिलांना सांगेन असा दम दिल्याचे राहुलने सांगितले. दरम्यान, राहुल आणि ताई निकम यांच्यात ५ मे रोजी विट्यात ढाणेवाडी परिसरात वाद झाला होता. दोघांमधला वाद इतका विकोपाला गेला की संशयित राहुल पवारने ओढणीने गळा आवळून ताई निकमचा खून केला. खून केल्यानंतर मृतदेह नदी पात्रात फेकल्याची कबुली राहुलने पोलिसांकडे दिली आहे.