धुळे (प्रतिनिधी) मृत्यू कसा होतो हे मोबाइलमध्ये ऑनलाईन बघितले आणि नंतर त्या वेबसाइटवर जन्म तारीख टाकली, मृत्यू कधी व कसा होतो हे पाहिले आणि काही क्षणातच मोबाईलमध्ये पाहिल्याप्रमाणेच हर्षल ऊर्फ सोन्या दीपक कुंवर (वय-१३) रा. शिंदखेडा जि.धुळे या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता तुकारामवाडीत घडली.
कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने तीन ते चार महिन्यांपासून हर्षल ऊर्फ सोन्या हा तुकारामवाडीतील मामा दिपक भदाणे यांच्याकडे आलेला होता. आजी काही कामानिमित्ताने बाहेर गेल्यानंतर त्याने मोबाईलमध्ये अनेक प्रकारच्या वेबसाइट बघितल्या व यानंतर बाथरूममध्ये जाऊन साडी बांधून गळफास घेतला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. हर्षल हा शिंदखेडा तालुका धुरे येथील रहिवासी होता. तो आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. लॉकडाऊनमध्ये तीन ते चार महिन्यांपासून हर्षल तुकाराम वाडीतील त्याचे मामा दिपक भदाणे यांच्याकडे आलेला होता. मामा दिपक यांचा कपडे इस्त्रीचा व्यवसाय आहे. मामा कामानिमित्ताने घराबाहेर होते तर हर्षल व त्याची आजी प्रमिलाबाई हे दोघेच घरी होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आजी कामानिमित्ताने दुकानावर गेली. दुकानावरून परत आल्यावर बाथरूममध्ये हर्षल साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तुकाराम वाडीतील ग्रामस्थांसह नातेवाईकांनी मृतदेह तातडीने खासगी रुग्णालयात यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविला. या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे तसंच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठलं. पंचनामा करुन शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्षल याच्याकडे मोबाइल होता. या मोबाईलमध्ये त्याने एक वेबसाइट ओपन करून मृत्यू कधी होणार असा सर्च करत स्वतःची जन्मतारीख टाकलेली असल्याचं दिसून आलं. तसंच यानंतरही त्याने यूट्यूबसह अनेक वेबसाइट ओपन केल्याचं दिसून आलं. मोबाईलमध्ये वेबसाइट बघितल्यानंतर आजी काही वेळासाठी बाहेर जाताच हर्षलने मोबाइलमध्ये बघितल्याप्रमाणे बाथरूममध्ये जाऊन गळफास घेतला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. मयत हर्षल याच्या पश्चात वडील दीपक कुंवर, आई कविता व बहीण कोमल असा परिवार आहे. दिपक कुंवर यांचा शिंदखेडा येथे कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय आहे. तर हलाखीची परिस्थिती असल्याने हर्षलची आई भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करुन उदरनिर्वाहास मदत करते. एकुलत्या एक हर्षलच्या हट्टापायी तिने त्याला पैसे नसल्याने हप्त्यांवर पैसे परतफेडीच्या हिशोबाने काही दिवसांपूर्वीच १५ हजार रुपयांचा नवीन मोबाइल खरेदी करून दिला होता. मात्र मुलाचा हा नवीन मोबाइलचा हट्ट आणि हा मोबाइलच मुलाच्या मृत्यूस कारणीभूत होणार आहे याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहेत. मुलाकडील मोबाइल जप्त पोलिसांनी जप्त केला आहे.