जळगाव (प्रतिनिधी) घरी येवून पत्नीशी शारिरीक संबंधाची मागणी करणाऱ्या प्रियकाराला नकार दिल्यामुळे पत्नी व तिच्या प्रियकाराने पतीला बेदम मारहाण केली. तसेच पत्नीच्या अनैतिक संबध असल्याने गावात बदनामी झाल्याने मानसिक तणावात असलेल्या तरुणाने विष प्राशन केले होते. या तरुणावर वीस दिवसांपासून उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. दरम्यान, आत्महत्येस कारणीभूत ठरलेली पत्नी व तिचा प्रियकर दोघांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या तरुण आपल्या पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होता. त्या तरुणाच्या पत्नीचे दुसऱ्या गावात राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे अडीच महिन्यांपुर्वी ती विवाहिता प्रियकरासोबत पळून गेली होती. दरम्यान, तरुणाने त्याच्या पत्नीची समजूत काढून तीला घरी बोलावून घेतले. त्यानंतर दि. १९ एप्रिल २०२४ ते दि. १६ जून २०२४ या कालावधीत दि. १५ जून रोजी रात्री- साडे नऊ वाजता विवाहितेचा प्रियकर हा त्यांच्या घरी आला. याठिकाणी त्याने मयत तरुणाच्या पत्नीसोबत शारिरीक संबंधाची मागणी केली. मयत तरुणाने त्याला नकार दिला असता त्याचा राग आल्याने या तरुणासह मयताच्या पत्नी या दोघांनी लाथाबुक्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
आपल्या अनैतिक संबंधाची गावात चर्चा होऊन बदनामी झाल्याने तरुण गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. याच कारणावरुन मानसिक व शारिरीक त्रासाला कंटाळून तरुणाने विष प्राशन केले होते. या तरुणावर नाशिक येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतू त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्याला जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतांना त्याची प्राणज्योत मालवली. उपचार सुरु असतांना भावाचा मृत्यू झाल्यानंतर मयताच्या भावाने तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ५ जुलै रोज भादवि कलम ३०६, ३२३,५०६, ३४ प्रमाणे मयताची पत्नी व तिचा प्रियकराविरुध्द गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहे.