मुंबई (वृत्तसंस्था) वडिलांच्या अंत्यविधीसाठी नाशिककला आलेल्या मावस सासूवर जावयाने वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने अमरावती येथील नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग झाला आहे. संशयित नितीन आशू वाणी (वय ३५, रा. भारतनगर, नाशिक, मूळ रा. रिसोड, जि. वाशीम) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गेल्या सप्टेंबर महिन्यात पीडित महिलेच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यविधीला महिला मूळ रिसोड तालुक्यातून नाशिकमध्ये आली होती. यावेळी संशयित नितीन आशू वाणी (३५, रा. भारतनगर, मूळ वाशिम) याने पीडित महिलेला आपल्या घरी बोलावून घेत साडीचोळी करण्याचा बनाव केला.
पीडित महिला रात्री मुक्कामी थांबली असता मध्यरात्रीच्या सुमारास संशयित नितीन याने नात्याने मावस सासू लागणाऱ्या पीडितेचा झोपेत गळा दाबला आणि त्यांना विषाची बाटली दाखवून दमदाटी करत बलात्कार केल्याचे फिर्यादीत पीडित महिलेने म्हटले आहे. त्यानंतर पुन्हा १ ऑक्टोबर रोजी पीडितेला तिची अश्लील छायाचित्रे मोबाइलवर दाखवून धमकावत एका हॉटेलमध्ये येण्यास भाग पाडले आणि तेथेही संशयिताने पुन्हा अत्याचार केला. यानंतर १० नोव्हेंबर रोजी संशयित नितीन याने अमरावती गाठून तेथे पीडितेच्या राहत्या घरी जाऊन पुन्हा शारीरिक अत्याचार केला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेने फिर्यादीत केला आहे. यानंतर पीडित महिलेने अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. पोलिसांनी तेथे गुन्हा दाखल करून प्रथम घटना नाशिकमधील मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा वर्ग करण्यात आला. याप्रकरणी संशयित नितीन हा अद्याप फरार असून पुढील तपास मुंबईनाका पोलिसांकडून केला जात आहे.