जळगाव (प्रतिनिधी) कानळदा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन अज्ञात आरोपींनी शतपावली करणाऱ्या एका व्यापाऱ्याकडून तब्बल चार लाखांचा ऐवज लुटून नेल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.
यासंदर्भात अधिक असे की, महेंद्रकुमार लक्ष्मीनारायण मंडोरे (वय ६४, रा. नवी पेठ) हे सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास तूररखेडा शिवारात इंदुमती टॅक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी समोर कानडदा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शतपावली करत होते. यावेळी अचानक दोन आरोपी समोरून आले आणि त्यांनी श्री.मंडोरे यांच्या पोटाला चाकू लावून जीवे ठार मारण्याची धमकी देत ८० हजार रुपये रोख, १ लाख ५७ हजार ५०० रुपयाचे ६३ ग्रॅम सोन्याचे ब्रासलेट, १ लाख ३७ हजार ५०० रुपयांचे 55 ग्रॅम सोन्याची चैन, ३७ हजार ५०० रुपयांचे १५ ग्रॅम सोन्याची अंगठी असा ऐवज लुटून नेला. यासंदर्भात तालुका पोलीस स्थानकात भादवि कलम ३९२,५०६, ४२७, ३४ अन्वये दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एवढी मोठी रोकड आणि दागिने घेऊन मंडोरे कसे फिरायला गेले. या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहे. दरम्यान, आरोपींना मंडोरे यांना ६०० रुपये परत दिले. तसेच हातातील २ सोन्याच्या अंगठ्या पण घेतल्या नाहीत, अशी माहिती देखील पोलीस सूत्रांनी दिली आहे.