धुळे (वृत्तसंस्था) तळोजा (ता. पनवेल, जि. रायगड) भागातून चोरीस गेलेले आठ महिन्यांचे बाळ शिरपुरात (जि. धुळे) एका संशयित मद्यधुंद अवस्थेतील महिलेकडे आढळून आले. हे बाळ तळोजा येथील एमआयडीसीत राहणाऱ्या दाम्पत्याचे असल्याचे समजल्याने यासंदर्भात तळोजा येथील पोलीस अधिक तपासासाठी शिरपुरात दाखल झाले आहेत. हे बाळ शिरपूरच्या त्या मद्यधुंद महिलेकडे कसे आले? हे बाळ या महिलेनेच आणले की त्यामागे अजून कोणी आहे? याबाबत पोलीस सखोल
तपास करीत असून यासंदर्भात मुले चोरणारी टोळी सक्रिय असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मुलांची चोरी करून पुढे त्यांच्यामार्फत भीक मागणे, चोरी करून आणणे अशी कामे केली जात असल्याचेही बोलले जात आहे.
३० जुलै २०२४ रोजी दुपारी शिरपूर शहरात मद्यधुंद अवस्थेत एक महिला फिरताना दिसली. त्या महिलेकडे ७ ते ८ महिन्यांचे बाळ गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून दिसून येत आहे. त्या महिलेला ओळखणाऱ्यांनी बघितले तेव्हा यापूर्वी ही महिला एकटी राहत होती. मग अचानक
हे लहान बाळ या महिलेकडे कसे आले? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. याबाबत काही जणांनी या महिलेला बाळासह शिरपूर शहर पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. तेव्हा ही महिला मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले.
महिलेला तिच्याजवळ असलेल्या बाळासंदर्भात विचारपूस केली असता तिने वेगवेगळी उत्तरे दिली. हे बाळ त्या महिलेचे नसल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी त्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर तळोजा येथील एमआयडीसीत राहणाऱ्या एका दाम्पत्याने पोलिसांना फोन करून ते बाळ त्यांचे असल्याचे सांगितले. हे दाम्पत्य पंक्चरचे दुकान चालवून उदरनिर्वाह करीत आहे. बाळाला घेण्यासाठी हे दाम्पत्य दुसऱ्याच दिवशी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात आले. मात्र तोपर्यंत त्या
बाळाला धुळे येथील शिशुगृहात दाखल करण्यात आले होते. जिच्याकडे हे बाळ सापडले, त्या महिलेला चोपडा (जि. जळगाव) तालुक्यातील अकुलखेडा येथील मानव सेवा तीर्थ येथे दाखल करण्यात आले आहे.
शिरपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीएनए चाचणीनंतरच ते बाळ तळोजा येथील दाम्पत्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या दाम्पत्याने दोन महिन्यांपूर्वी आपले बाळ हरवले असल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी तळोजा पोलिसांकडून तपास सुरू होता. मात्र बेपत्ता
झालेले हे बाळ शिरपूर येथील एका महिलेकडे सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर तळोजा स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील या पथकासह चोपडा येथील मानव सेवा तीर्थ येथे दाखल झाल्या. त्या संशयित महिलेला आणि संस्थेचे व्यवस्थापक नरेंद्र पाटील यांना सोबत घेत शिरपूर शहर पोलीस ठाणे गाठले. त्या महिलेची चौकशी करण्यात येत असून महिलेकडून अद्यापही ठोस माहिती मिळत नसल्याने तळोजा पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतिमान केली आहेत.