नागपुर (वृत्तसंस्था) एकीकडे दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत शालेय पुस्तके पोहोचत नसल्याचे चित्र असताना, बालभारतीला मात्र हजारो टन पुस्तकं रद्दीत विकत आहे. २०१२ सालापासून बालभारतीने साडेपाच हजार टनांहून अधिक पुस्तके रद्दीत विकली. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी बालभारतीला या यासंदर्भातील माहिती माहितीच्या अधिकारात मागितली होती. विद्यार्थ्यांपर्यंत न पोहचलेली हजारो मेट्रिक टन पुस्तकं रद्दीत विकली जात असल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून पुढं आली आहे. नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी २०१२ पासून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यास संशोधन मंडळाने किती पुस्तकं रद्दीत काढली आणि त्यापासून किती महसूल मिळाला, असे प्रश्न विचारले होते. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल २०१२ ते मार्च २०१९ या दरम्यान चार वेळा पुस्तकं रद्दीत काढण्यात आली. रद्दीत काढलेल्या पुस्तकाचे वजन ५ हजार ६३३ मेट्रिक टन एवढे होते. त्यापासून ६ कोटी ४० लाख एवढा महसूल मिळाला. यातून बालभारतीचे काम किती नियोजन शून्य आहे याची प्रचिती येते.
यासंदर्भात ‘मेस्टा’ संघटनेने विद्यार्थ्यांच्या पुस्तकात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. जाणीवपूर्वक पुस्तकं विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली जात नाही, रद्दी मधून पैसे खाता यावे, यात अधिकारी आणि मंत्री सहभागी असल्याचा आरोप करत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ‘मेस्टा’चे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी केली आहे.