भुसावळ (प्रतिनिधी) येथील रेल्वे कॉलनी परिसरातील पोलीस चौकीजवळ काल रात्री एकाचा खून झाल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील रेल्वे कॉलनी परिसरातील पोलीस चौकी क्रमांक सातच्या परिसरातील मशिदीच्या समोर आज सकाळी पत्र्यांच्या खाली एक मृतदेह आढळून आल्याचे उघडकीस आले. याबाबतची माहिती परिसरातील नागरिकांनी शहर पोलीस स्थानकाला दिली. यानंतर पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता खून झालेल्या व्यक्तीचे नाव सुनील अरूण इंगळे (रा. समतानगर रेल्वे दवाखाना मागे, भुसावळ) असल्याचे निष्पन्न झाले. तर याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. तर हा खून रात्री बाराच्या सुमारास झाला असून मयताच्या अंगावर धारदार हत्याराचे वार करण्यात आले असून त्याला दगडाने ठेचण्यात आल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, खुनाची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती जाणून घेतली.