सावदा (प्रतिनिधी) ग्रामीण रुग्णालयातील अधिपरिचारीका, पोलिस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालुन जीवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंगळवारी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या दोघांनी जास्त दुखापत झाल्याचे प्रमाणपत्र न दिल्यामुळे हि मारहाण करण्यात आलीय.
घटना अशी की, रवी जानराव पाटील (रा. सावदा), आकाश योगेश भंगाळे (रा. चिनावल), आणि चंद्रकांत गोपाळ पाटील (रा. कोचर, ता. रावेर) या तीघांना सोमवारी रात्री कुणीतरी बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेतच तीघे जण सावदा पोलिस ठाण्यात गेले होते. मारहाण करणाऱ्यांच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करुन घेण्याची मागणी त्यांनी केली. परंतु, मारहाण नेमकी कशाने झाली आहे? त्यासाठी कोणते कलम लागतील? याची खात्री करुन घेण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी तीघांना मेडीकल मेमो देऊन सावदा ग्रामीण रुग्णालयातून प्रमाणपत्र आणण्यासाठी पाठवले. यावेळी तीघांनी सुरूवातीला पोलिस ठाण्यातच गोंधळ घातला होता. परंतु, पोलिसांनी समजुत काढून त्यांना आधी रुग्णालयात पाठवले. मारहाण करणाऱ्यांच्या विरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी तिघांची मानसिकता झाली होती. त्यासाठी डॉक्टरांनी जास्त दुखापत झाल्याचे प्रमाणपत्र द्यावे असा हट्ट तीघांनी धरला.
सर्वात आधी त्यांनी सावदा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निकीता भिरूड आणि अधिपरिचारीका शकुंतला राजनाथ पाल यांच्याशी हुज्जत घातली. पोलिस कॉन्स्टेबल विनोद दामोदर यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिस कर्मचाऱ्याशी देखील हुज्जत घालून शिवीगाळ केली. यामुळे रुग्णालयात गोंधळ निर्माण झाला होता. आम्ही तुम्हाला पाहुन घेऊ, जीवेठार मारु अशी धमकी त्यांनी अधिपरिचारीका व पोलिस कर्मचारी दामोदर यांना दिली. या प्रकरणी परिचारीका पाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तीघांच्या विरुद्ध सावदा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे, जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.