मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील कायदा-सुवव्यस्था बिघडवण्यासाठी इतर राज्यातून काही लोकं महाराष्ट्रात दाखल झाल्याची माहिती गृहविभागाने दिली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. दरम्यान, योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना गृह विभागाने दिली आहे.
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली कायदा, सुव्यवस्थेची माहिती
राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत भोंगे काढण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर अनधिकृत भोंगे उतरवावे अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. जर भोंगे काढले नाही तर त्यासमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती दिली. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात आणि कोणाच्या आदेशाची वाट पाहू नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. महाराष्ट्राचे डीजीपी आणि मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून संभाषण केले, कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा झाली.
काही गुंड प्रवृत्तीचे लोक मुंबईत आणून गडबड करण्याचा प्रयत्न – संजय राऊत
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, राज्याच्या बाहेरुन काही गुंड प्रवृत्तीचे लोक मुंबईत आणून गडबड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यांची राज्यात ताकद नाही. अशा लोकांकडून हे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या सुपाऱ्या चालणार नाही. मुख्यमंत्र्यांचे याकडे लक्ष असल्याचेही राऊत यांनी म्हटले. राज्यातील यंत्रणा,नेतृत्व सक्षम आहे. हे राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असतील. तर ती त्यांची सर्वात मोठी चूक ठरणार असल्याचा इशाराही राऊत यांनी दिला. राज्यातील पोलीस योग्य पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.
गृह विभागही सतर्क, पोलिसांना कारवाईच्या सूचना
राज्यात उद्या परराज्यातील लोक येणार असून कायदा सुव्यवस्था मुद्दा बिघडू शकतात अशी शक्यता आहे. अशा प्रकारचा अहवालही गृह विभागाला मिळाला आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना गृह विभागाने दिली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न कोणी केल्यास योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे. या कारवाईसाठी कोणाच्या आदेशाची प्रतिक्षा करू नये अशा सूचना गृहविभागाने पोलिसांना दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.