मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईच्या नालासोपारामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तुलिंज पोलीस ठाण्यात एका पोलीस हवालदाराने आत्महत्या केली आहे. स्वत:वर गोळ्या झाडून हवालदाराने आयुष्य संपवलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सखाराम भोये असं आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. नालासोपाऱ्यातील तुळींज पोलीस स्टेशनमध्ये ही काल रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सखाराम भोये या पोलिस कर्मचाऱ्यानं ड्युटीवर असताना आयुष्य संपवलं आहे. सकाळी ६ वाजता ही घटना उघडकीस आली. सखाराम भोये हे रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आले. पोलीस कर्मचाऱ्यानं एवढे टोकाचं पाऊल का उचललं असावा, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. सखाराम भोये २००३ च्या बॅचचे होते. ते नाशिकमधील हरसूल गावचे रहिवासी होते. २०१६ पासून तुळींज पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. बुधवारी त्यांची रात्रपाळी होती. रात्रपाळी संपून घरी जाण्याच्या तयारीत असताना त्यांनी सरकारी पिस्तूलमधून गोळी झाडून आत्महत्या केली.
त्याच्या पश्चात त्यांची दोन मुलं पत्नी, आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्यावर काही कामाचा ताण होता का की अन्य काही कारण होतो याचा पोलीस तपास करत आहेत, अशी माहिती मीरा-भाईंदर, वसई -विरारचे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी दिली आहे.