अहमदनगर (वृत्तसंस्था) काही अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षिकेचे फोटो मॉर्फ करत इन्स्टाग्राम सारख्या सोशल साइटवर अपलोड केल्यामुळं प्रचंड खळबळ उडाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील एका शाळेत काही टवाळखोर विद्यार्थ्यांनी शिक्षिकेच्या फोटोंचे मॉफिंग करून, त्याचे अश्लील फोटोंमध्ये रूपांतर करून ते इन्स्टाग्राम सारख्या सोशल साइटवर अपलोड केले. ही पोरं एवढ्यावरच थांबली नाहीत. तर त्यांनी त्या शिक्षिकेला वारंवार व्हिडीओ कॉल करून अश्लील कृत्य देखील करत होते.
आणखी एका शाळेत असाच प्रकार घडला. शाळेतील एका शिक्षिकेचा मोबाइल क्रमांक हा पॉर्न साईटवर अपलोड करण्यात आला होता. तर एका विद्यार्थ्याचा फोटो आणि मोबाइल क्रमांक पॉर्न साइटवर अपलोड करण्यात आला, तर चौथ्या प्रकरणात एका शालेय मुलीचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून अश्लील चॅट व्हायरल करण्यात आले होते. पीडित व्यक्तींनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्यानंतर, तपासात हे गुन्हे करणारे ओळखीचेच अल्पवयीन विद्यार्थी असल्याचं समोर आलं.
‘कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मुलांच्या हातात दिवसभर मोबाईल आहे. त्यामुळे शिक्षणाबरोबरच मुलांचा सोशल मीडियाकडे कल वाढला आहे. असं असलं तरी तरी पालकांनी आपला पाल्य शिक्षण घेता घेता इंटरनेटचा वापर आणखीन कुठल्या गोष्टीसाठी करतोय, त्यात तो काय करतो आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. पालकांनी लक्ष ठेवल्याने मुलाना आपण चुकीचे काही करत नाही ना असा धाक बसेल’, असं आवाहन पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी यांनी केलं आहे.
















