अकोला (वृत्तसंस्था) रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी असलेल्या रुग्णवाहिकेत जुगाऱ्यांनी चक्क जुगाराचा डाव रंगवल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. याप्रकरणी २६ मे रोजी कारंजा शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करीत ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
कारंजा शहर परिसरात रुग्णवाहिकेत जुगार रंगत असल्याची गुप्त माहिती कारंजा शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शहर पोलिसांच्या एका पथकाने धाड टाकली असता रुग्णवाहिकेतच जुगार अड्डा रंगल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी ८०हजार रुपये किमतीची रुग्णवाहिका व १३० रुपये नगदी आणि ५२ पत्ते तास असा ८० हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कारंजा उपजिल्हा रुग्णालयाबाहेर सार्वजनिक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रुग्णवाहिकेत काही इसम ५२ पत्त्यावर पैशाची बाजी लावून जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी यावेळी विनोद उंकडराव खोंड (रा. किन्हीरोकडे, महादेव बापूराव हाके, रा. शिवाजीनगर, कारंजा) व किशोर महादेव खोडके (रा. मोझरी, ता. मंगरूळपीर) यांना ताब्यात घेतले.
रुग्णवाहिकेला उपप्रादेशिक परिवहन विभागाचा नंबरही नव्हता. मारुती सुझुकी ओमनी ही रुग्णवाहिकाही ताब्यात घेतली. पोलिस उपनिरीक्षक सुनील खंडारे यांच्या फिर्यादीवरून उपरोक्त तीन आरोपीविरुद्ध जुगार अॅक्ट १२ अ नुसार कारवाई करण्यात आली.
दरम्यान, पोलिस स्टेशन आवारात उभी केलेली रुग्णवाहिका शनिवारी रात्रीच्या सुमारास चोरीला गेल्याचे समोर आले आणि सीसीटीव्ही फुटेजवरून रुग्णवाहिका नेणाऱ्या मनसे कार्यकर्त्यावर कारंजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अनुप ठाकरे व त्याचा सोबती गणेश मातोडे यांनी ही गाडी कारंजा पोलिस स्टेशनमधून चोरून नेल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.