कोल्हापूर (वृत्तसंस्था) बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराने पाटबंधारे विभागातील निवृत्त अभियंत्याचा मृत्यू झाला. केरबा शिवाजी सुतार (वय ६६, सध्या रा. बोंद्रेनगर, कोल्हापूर, मूळ रा. मिणचे खुर्द, ता. भुदरगड) असे मयताचे नाव आहे. सकाळी आठ वाजेच्या सुमारास बालिंगा-पाडळी रोडवर गगनगिरी पार्कमध्ये घटना घडली.
केरबा सुतार पाटबंधारे विभागात अभियंता पदावरून निवृत्त झाले होते. सोमवारी नेहमी प्रमाणे सकाळी केरबा सुतार बॅडमिंटन खेळण्यासाठी गगनगिरी पार्कमध्ये गेले होते. खेळताना त्यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी खेळ थांबविला. तब्येत जास्तच खराब झाल्यामुळे त्यांच्या मित्रांनी त्यांना तेथूनच त्यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
नोकरीत असल्यापासून ते सेवानिवृत्तीनंतरही रोज सकाळी मित्रांसोबत बॅडमिंटन खेळण्याची सवय कायम होती. दरम्यान, सुतार यांना यापूर्वी हृदयविकाराचा कसलाही त्रास नव्हता. त्यांची प्रकृती ठणठणीत होती. खेळता-खेळता हृदयावर •अधिक ताण वाढून त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता नातेवाइकांनी वर्तवली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातू असा परिवार आहे.