नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात दोषी आढळल्याने तुरुंगात असलेल्या आसारामबापूच्या (Asaram Bapu Ashram News) आश्रमात आता आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बहराइच रोडवर असलेल्या आसारामबापूच्या आश्रमात 12 वर्षांच्या एका मुलीचा मृतदेह सापडला. एका ऑल्टो कारमध्ये हा मृतदेह आढळला. ही मृत तरुणी चार दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री गोंडा पोलिसांना याची माहिती मिळाली. बहराइच मार्गावरील आसाराम बापूच्या आश्रमात 12 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला. ही माहिती समजताच आश्रम आणि परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये मृतावस्थेत आढळलेली मुलगी ही आश्रमाजवळ वास्तव्यास होती. ती चार दिवसांपासून घरातून बेपत्ता होती. ज्या कारमध्ये तिचा मृतदेह आढळला, ती ऑल्टो कार मागील काही दिवसांपासून आश्रमात उभी होती. गुरुवारी रात्रीच्या वेळी कारमधून दुर्गंधी येऊ लागल्याने आश्रमातील कर्मचाऱ्यांनी कार उघडली. त्यावेळी त्यांना मृतदेह आढळला. कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने आश्रम आणि कारची तपासणी करत आहेत.
मृत मुलीच्या आईने सांगितले की, मंगळवारी रात्रीपासून माझी मुलगी बेपत्ता झाली आहे. आम्ही जवळपासच्या परिसरात तिचा शोध ही घेतला. मात्र, ती सापडली नाही. पोलिसांनाही याची माहिती दिली. त्यानंतर अचानकपणे तिचा मृतदेह कारमध्ये आढळला. काही वर्षापूर्वी मुलीच्या वडिलांचे अपहरण झाले होते. ज्यांनी त्यांचे अपहरण केले, त्यांनीच माझ्या मुलीची हत्या केली असा आरोप मुलीच्या आईने केला आहे. मुलीच्या आईने काही संशयितांची नावे सांगितली असून पोलीस तपास सुरू आहे.