नागपूर (वृत्तसंस्था) प्रतापनगर पोलीसठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री अजून एका हत्येची घटना घडली. मनोविकृत सुनेने तिच्या ८० वर्षांच्या सासूची भाजीपाला कापायच्या चाकूने गळा चिरून हत्या केली. पूनम आनंद शिखरवार (३६), असे आरोपी सुनेचे, तर तारादेवी ब्रिजराज शिखरवार, असे मृतक सासूचे नाव आहे.
प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुडधे ले-आउटमधील प्लॉट नंबर ६ येथे आरोपी महिला ही तिच्या पती, मुले आणि सासूसोबत राहते. आरोपीच्या पतीचे टू व्हीलरचे गॅरेज असून दोन मुले आहेत. २ सप्टेंबर रोजी सायंकाळी सासू आणि सुनेमध्ये नेहमीप्रमाणे वाद झाला.
हा वाद कमालीचा विकोपाला गेला. संतापलेल्या सुनेने रागाच्या भरात स्वयंपाक घरातून भाजीपाला कापायचा चाकू आणला आणि सासूला खाली पाडून तिच्या गळ्यावरून फिरविला. यात रक्तबंबाळ झालेल्या वृद्ध सासूचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सुनेला ताब्यात घेतले. या घटनेने प्रतापनगरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, खुनाचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने प्रसिद्ध केलं आहे.